ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांची सुवर्णमयी कामगिरी!

मुंबई व भुवनेश्वर येथे पार पडलेल्या विविध प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ठाण्याच्या क्रीडा विश्वात अभिमानाची नोंद केली आहे. अनुभवी खेळाडू अजिता रवींद्रन आणि उदयोन्मुख तारा समृद्धी सिंह यांनी आपल्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाने “महिला शक्ती”ची ताकद पुन्हा अधोरेखित केली.
मुंबई येथे झालेल्या ३२व्या जी. डी. बिर्ला मेमोरियल ओपन व्हेटरन मास्टर्स इंटर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ४५ वर्षांवरील महिला एकेरी गटात अजिता रवींद्रन हिने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत तिने सोनल बट्टड हिच्यावर १५–१०, १५–७, १५–१३ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत नामिता मेहता-विजयकर यांच्याविरुद्ध २१–१४, १५–२१, २१–११ अशी चुरशीची लढत जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अव्वल मानांकित पूजा झलानी हिच्याविरुद्ध २४–२६, २१–१९, २१–१८ असा थरारक विजय मिळवत अजिताने आपले अनुभव, संयम आणि जिद्द सिद्ध करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
दरम्यान, भुवनेश्वर येथे ७ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची समृद्धी सिंह हिने दुहेरी यश मिळवत आपली चमकदार कामगिरी नोंदवली. तिने सी.ए.जी. संघाचे नेतृत्व करत संघ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तसेच वैयक्तिक प्रकारात महिला दुहेरी गटात रौप्यपदक जिंकत “डबल बोनान्झा” साध्य केला. तिच्या खेळातील आत्मविश्वास, कोर्टवरील हालचाल आणि निर्णायक क्षणांतील स्थैर्य विशेष उठून दिसले.
या यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खांडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सुरू असलेल्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील प्रशिक्षण व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले तसेच प्रशिक्षक टीमच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर यश मिळत आहे.
या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपआयुक्त मीनल पलांडे यांनी अभिनंदन करताना सांगितले, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील महिला खेळाडू सातत्याने उच्च पातळीवर कामगिरी करत आहेत. अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांचे यश हे ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिबिंब आहे आणि भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली असून, महिला खेळाडूंच्या या यशामुळे ठाण्यातील क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *