युवा पलटन, भारत पेट्रोलियम, मुंबई पोस्टलसह ११ संघांची पुढील फेरीत मजल

मुंबई :प्रभादेवी येथे आयोजित ‘ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६’ स्पर्धेत दिग्गज संघांनी दमदार कामगिरी करत बाद फेरी गाठली आहे. युवा पलटन, मुंबई पोस्टल, भारत पेट्रोलियम, सी.जी.एस.टी., मुंबई बंदर, डी.पी.यू. पुणे, मिड लाईन, मध्य रेल्वे, एच.ए.एल. नाशिक, मीरा भाईंदर महानगर पालिका, युनियन बँक आणि ठाणे महानगर पालिका या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
आदर्श नगर, वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या साखळी सामन्यांमध्ये फ गटात रायगडच्या मिड लाईन अकादमीने मध्य रेल्वेवर ४९-२० अशी एकतर्फी मात केली. धीरज बैलमारेच्या झंझावाती चढाया आणि आदर्श कुमारच्या पकडीमुळे मिड लाईनने तब्बल २९ गुणांनी विजय मिळवला. मात्र उपविजेते म्हणून मध्य रेल्वेनेही बाद फेरी गाठली.
मीरा भाईंदर महानगरपालिकेने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत जे.जे. रुग्णालयाचा ४१-३० असा पराभव केला. संकेत खाताते आणि संदीप गुरव यांच्या खेळामुळे संघाने बाद फेरीत स्थान मिळवले. जे.जे. रुग्णालयाचा रिहान शेख आणि ओमकार दारकुडे यांचा सुरुवातीचा खेळ प्रभावी ठरला, मात्र शेवटी संघाला पराभव स्वीकारावा लागला.
युनियन बँकेने हिंदुजा रुग्णालयावर ४५-२६ अशी मात करत दमदार सुरुवात केली, तर ठाणे महानगरपालिकेविरुद्ध १४-१४ अशी बरोबरी साधत बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. अतुल जाधव आणि अक्षय तावडे यांनी संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
क गटात मुंबई बंदर आणि डी.पी.यू. पुणे यांच्यात ३८-३८ अशी रोमांचक बरोबरी झाली. तेजस टक्के, सौरभ राऊत (मुंबई बंदर) तसेच विकास जाधव, सुमित घोलप (डी.पी.यू.) यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला.
ब गटात भारत पेट्रोलियमने सी.जी.एस.टी.वर ४४-४० अशी चुरशीची मात करत गट विजेतेपद पटकावले. योगेश दहिया आणि राजकमल कुमार यांच्या खेळामुळे हा विजय शक्य झाला. सी.जी.एस.टी. उपविजेते ठरले.
अ गटात युवा पलटनने मुंबई पोस्टलला ३२-३१ अशा थरारक सामन्यात पराभूत करत गटविजेतेपद मिळवले, तर मुंबई पोस्टल उपविजेते ठरले.
स्पर्धेतील साखळी फेरीतच अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले असून आता बाद फेरीत आणखी रंगत वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *