ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे, खेवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बुधवारी आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के व महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर व स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मालती पाटील, नम्रता पमनानी,  नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला. या नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करुन द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करुन प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरे उपलब्ध केली.
बुधवारी टेंभीनाका आनंदाश्रम येथे खासदारनरेश म्हस्के यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात 10 बाधित रहिवाशांना घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेव‍िका मालती पाटील  यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.  या रहिवाशांना पर्यायी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी रोहित पिंपळोलकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *