ठाणे : प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले. प्रांताध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, शिक्षक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शिक्षण विभागाच्या विसंगत धोरणांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनात शिक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा मुद्दा प्रखरपणे मांडण्यात आला. एप्रिल महिना अर्धा संपत आला असतानाही मार्च महिन्याचे वेतन न मिळाल्याने शिक्षकांना कर्जाचे हप्ते आणि आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.  ‘दर महिन्याच्या १ तारखेला पगार’ ही परंपरा कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांचे समायोजन करून त्यांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, आणि तर्कहीन निकष लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याशिवाय, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांना निवडणूक कामात (BLO) सक्तीने जुंपले जात असल्याचा आरोप करत, शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची मागणी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी केली. परीक्षा व निकालाच्या धामधुमीत १० वी, ११ वी व १२ वीच्या काळात ‘पटपडताळणी’ प्रक्रिया राबवू नये, ती सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली. “प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास १६ एप्रिलचे आंदोलन ही केवळ सुरुवात असेल,” असा इशारा भगवान गावडे यांनी दिला.
या आंदोलनावेळी शहाजी खुस्पे (नगरसेवक, ठाणे महापालिका), मारुती पडळकर (सहसचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना), जगदीश भगत (कोकण विभाग अध्यक्ष), नरेंद्र शिंदे (संपर्कप्रमुख, ठाणे जिल्हा), कुलदीप पाटील (अध्यक्ष, ग्रामीण), संतोष गायकवाड (अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय), प्रमोद पाटोळे (प्राथमिक अध्यक्ष), उदय कदम (सरचिटणीस), दिलीप चौधरी (सचिव), प्रशांत सातपुते (विभागप्रमुख), स्मिता पाटील (सचिव, महिला आघाडी), भांगरे सर (प्रसिद्धी प्रमुख), महेश दहिभाते (अध्यक्ष, कोपरी-पाचपाखाडी), विजय भांगरे (समन्वयक) यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *