सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरस्कारांचा वर्षाव

राज्यातील १६ दिग्गज व्यावसायिक संघ  भिडणार

मुंबई, दि. १७ (क्री.प्र.)- क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेवर छप्पर फाडके पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. राज्यातील तगड्या १६ व्यावसायिक पुरुष संघांचा आणि १५ महिला संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धांत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसांची उधळण केली जाणार आहे. येत्या १८ ते २१ एप्रिलदरम्यान विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हा कबड्डीतील चढाई-पकडींचा थरार रंगणार आहे.
एकीकडे आयपीएलची फटकेबाजी सुरु असताना आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानाच्या संयोजनाखाली राज्यातील व्यावसायिक कबड्डी संघांची ताकद दाखवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  होणार्‍या कबड्डीच्या पकडापकडींच्या संघर्षासाठी आंबडेकर उद्यानातील क्रीडानगरीला ‘कबड्डी पंढरी’ चे रुप दिले आहे. राज्यातील पुरुष आणि महिलांचे अव्वल आणि बलवान संघ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे कबड्डीप्रेमींना प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेत सहभागी संघ आणि खेळाडूंनाही लखपती करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्वाधिक रोख रकमेची स्पर्धा असलेल्या या कबड्डी थरारात व्यावसायिक स्पर्धेतील विजेत्यांना दोन लाखांचे  पारितोषिक दिले जाणार आहे तर उपविजेता संघ दीड लाखांचा मानकरी ठरेल. उपांत्य फेरी पराभूत संघही पाऊण लाखांचे बक्षीस मिळवतील. महिलांच्या स्पर्धेतील विजेता संघ एक लाखांचा पुरस्कार जिंकेल तर उपविजेता पाऊण लाखाचे इनाम मिळवेल. इथेही उपांत्य परभाूत संघ ३५ हजार रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. सर्वात विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना मोटर बाईक आणि स्कूटी दिली जाणार असल्यामुळे हे जिंकण्यासाठी खेळाडू पहिल्या लढतीपासूनच आपला जोरदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आजवर अनेक कबड्डी स्पर्धांचे दिमाखदार ेआयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार राऊत यांनी व्यावसायिक कबड्डी संघांच्या जोरदार आणि रोमहर्षक खेळाची मेजवानी सादर करण्यासाठी  मुंबई शहरच्या तगड्या ८ संघांसह उपनगर, पुणे, ठाणे, नंदुरबार, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यातील बलाढ्य संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ टागोर नगरात उभारलेल्या क्रीडानगरीतील दोन मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक आणि आमदार सुनील राऊत यांनी दिली.
प्रो कबड्डीच्या सुपरस्टार्सचीही चढाई
या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल ३० सुपरस्टार  विक्रोळी पूर्वेला असलेल्या स्पर्धेत आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, -संकेत सावंत, अस्लम इनामदार, साहिल राणे, सुशांत साईल, अजिंक्य कापरे सारखे अनेक तूफानी खेळाडू आपला झंझावात दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील संघ
व्यावसायिक पुरुष संघ-युवा पलटण, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, सीजीएसटी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्टल, युनियन बँक (सर्व मुंबई शहर), लिब्रा अ‍ॅग्रो (उपनगर), ठाणे महानगरपालिका (ठाणे), रुपाली ज्वेलर्स (नंदुरबार), संत सोपानकाका सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार, आयकर (सर्व पुणे), मिडलाइन फाऊंडेशन (रायगड), डीवाय पाटील (नवी मुंबई).
स्थानिक महिला संघ – स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, महात्मा गांधी अकादमी (सर्व उपनगर),शिवशक्ती महिला संघ, डॉ, शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, विवेक संघ (सर्व मुंबई), कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी (रायगड), कुलाई क्रीडा मंडळ (पालघर), राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स क्लब , तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लब, पतंगराव कदम (सर्व पुणे), अनिकेत स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी), शिवाजी उदय स्पोर्ट्स क्लब (सातारा), होतकरु मित्र मंडळ (ठाणे).
0000000000
जान्हवी मोरे स्मृती चषक मुला-मुलींची कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला
ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील‌ मुला -मुलींच्या राज्य स्तरीय   कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल,दत्तनगर,डोंबिवली,पूर्व  येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये १०० असुन २० एप्रिल पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.प्रवेशासाठी दिलीप कर्वे, मो.९१६७७४४०४९.  संजय ठाकुरदेसाई मो.   ९८६७५८५२७१. अथवा पर्णाद जोशी मो.  ८४५०९५४५८४ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *