श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा
याशिका पुजारी, तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
ठाणे :-महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्टस् ची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. पाच हजार (₹५०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य मैदानात संपन्न झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या अंतिम सामन्यात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टस् ने पूर्वार्धातील १३-१७ अशा पिछाडीवरून पालघर(विरार)च्या विवेक स्पोर्टस् चा प्रतिकार ३७-३३ असा मोडून काढत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार(₹५१०००/-) आपल्याकडे खेचून आणले. हरजीत, स्वीटी, सौंदर्या यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विवेक स्पोर्टस् ने पूर्वार्धात लोण देत ४गुणांची आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांनी आपला खेळ गतीमान करीत चढाईत भराभर गुण घेत लोण ची परतफेड केली. त्यांना प्रतिक्षा तांडेलने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात स्वराज्यला सरशी साधता आली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने ठाण्याच्या ग्रीफिन्स जिम. चा ३६-३० असा पराभव करीत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार(₹५१०००/-) आपल्या खात्यात जमा केले. आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत श्रीराम संघाने पहिल्या डावात २०-१२ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात मात्र ग्रीफिन्सने आपल्या खेळाची गती वाढवीत लोण ची परतफेड करीत गुणा मधील फरक कमी केला. पण संघाला विजयी करण्यात त्यांचा खेळ कमी पडला. तुषार शिंदे, अंकुश पारले यांच्या संयमी व धूर्त चढाया त्यांना अमित सिंग, आदित्य पारले यांची मिळालेली बचावाची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. सुरज धुंदले, मनीष धनावडे, वेदान्त धामले, आदित्य पिलाणे यांनी दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात स्वराज्य स्पोर्टस् ने मिडलाईन अकॅडमी-नांदेडला तर विवेक स्पोर्टस् ने ओम् वर्तकनगरला नमवीत अंतिम फेरी गाठली . पुरुषांत श्रीराम क्रीडाने डॉन बॉस्कोला तर ग्रीफिन्स जिम. ने ५-५ चढायात मिडलाईनला ३२-२९(७-४) अशी चूरशीची मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. महिलांत विवेकची स्वीटी आणि स्वराज्यची समृद्धी मोहिते यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. पुरुषांत ग्रीफिन्सचा मनीष धनावडे आणि श्रीरामचा अमित सिंग यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले. या चारही खेळाडूना प्रत्येकी रोख रु. तीन हजार(₹३०००/-) देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ठाणे जिल्हा कबड्डी असो. चे अध्यक्ष व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, मंडळाचे विश्वस्त जुगलकिशोर मुंदरा, प्रभाकर सुर्वे, कृष्णा डोंगरे, पॅट्रिक फर्नांडिस, रवींद्र आंग्रे, सुधाकर मोरे, केशव मुकणे आदी मान्यवारांच्या उपस्थित पार पडला.
