आरएसए टी-२० कप

मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आरएसए टी-२० कप २०२५-२६ स्पर्धेत एमटीएनएल, ऍडव्हान्स सी.सी., पटेल सी.सी. आणि अशोक कामत सी.सी. या संघांनी दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिसऱ्या साखळी फेरीतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी व भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
एमटीएनएलचा एकतर्फी विजय
एमटीएनएल विरुद्ध गे कॅव्हिलिअर सामन्यात गे कॅव्हिलिअरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. एमटीएनएलने १८ षटकांत १४७/५ धावा केल्या. जय तलवरकर (२६), हर्ष घरसून (२८), शुभम जाधव (२३) व राहुल यादव (३०) यांनी योगदान दिले. प्रत्युत्तरात गे कॅव्हिलिअर संघ १४.५ षटकांत ८७ धावांत गारद झाला. शुभम जाधव (३ बळी) व धनंजय किणी (३ बळी) यांच्या गोलंदाजीमुळे एमटीएनएलने सहज विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरीसाठी शुभम जाधव सामनावीर ठरला.
ऍडव्हान्स सी.सी.चा दणदणीत विजय
स्पीड सी.सी. विरुद्ध ऍडव्हान्स सी.सी. सामन्यात ऍडव्हान्सने प्रथम गोलंदाजी करत स्पीड सी.सी.ला २० षटकांत ९८/८ धावांवर रोखले. जय डोळसने ४७ धावांची झुंजार खेळी केली. प्रतीक गोसावी (३ बळी) व आराध्ये माने (२ बळी) यांनी भेदक मारा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना हेत पटेलच्या ६५ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऍडव्हान्सने १३.१ षटकांत १०१/२ धावा करत विजय मिळवला. हेत पटेल सामनावीर ठरला.
पटेल सी.सी.ची सहज सरशी
पटेल सी.सी. विरुद्ध एसव्हीए चेंबूर सामन्यात पटेलने प्रथम गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना ९.५ षटकांत ४५ धावांत गुंडाळले. युवान शर्मा (३ बळी), साहिल (२ बळी) व सोहईल शेख (२ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. पटेल सी.सी.ने केवळ ४.३ षटकांत ५१ धावा पूर्ण करत सामना जिंकला. युवान शर्मा सामनावीर ठरला.
अशोक कामत सी.सी.ची सर्वांगीण कामगिरी
अशोक कामत सी.सी.ने क्रिकेट मंत्रा विरुद्ध १८ षटकांत १७३/७ धावा उभारल्या. ह्रिषीकेश चव्हाण (३६), निसार शेख (२९), प्रेम कदम (२०) व रणवीर (२५) यांनी योगदान दिले. प्रत्युत्तरात क्रिकेट मंत्रा संघ १८ षटकांत ९५/८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ओम कांबळेने ३ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
स्पर्धेचे सेमीफायनल सामने २३ एप्रिल रोजी एलआयसी ग्राउंडवर खेळवले जाणार असून, अंतिम सामना २४ एप्रिल रोजी रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *