ठाणे – टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरु करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि आयपीएलमध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा हे एक मोठे व्यासपिठ असून येणाऱ्या काळात ही स्पर्धा चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ठाण्यात व्यक्त केला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन-१ ( मुंबई-ठाणे-कोकण ) अध्यक्ष अभिजीत दरेकर, एमसीए सदस्य नगरसेवक विकास रेपाळे, आयोजक ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते.   उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते टीडब्ल्यूपीएल  चषकाचे अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व कॅप्टन हे ठाणे शहरातील असल्यामुळे क्रिकेटला चांगले भविष्य असल्याचे अजिंक्य नाईक यांनी मिश्किल वक्तव्य करत आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू हे पुढे येत असून येणाऱ्या काळात मुंबई आणि भारतासाठी ठाणे जिल्ह्यातून खेळाडू   मिळतील, असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. नविन नविन अॅक्टिव्हिटी आज क्रिकेटमध्ये ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आम्हाला वेळोवेळी मागदर्शन लाभत असून विकास रेपाळे हे देखिल क्रिकेटच्या भविष्यासाठी सक्रिय झाले असल्याने क्रिकेटला ठाणे जिल्ह्यात चांगली वाढ मिळेल, असा विश्वासही अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लेदर बॉल क्रिकेटवर जास्त लक्ष असते. पण टेनिस क्रिकेट हा गल्लीबोळातील खेळ आहे. सर्वसामान्यांची मुले टेनिस क्रिकेटमध्ये जास्त असून तो लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळावरही जास्त लक्ष देण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ठाण्यात मध्यंतरी प्रेसिडेंट क्लब एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. भारतभरातून टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू ठाण्यात आले होते. आज अनेक खेळाडू टेनिसकडून लेदर क्रिकेटकडे वळत आहेत. लेदर हे भविष्य असल्यामुळे टेनिस कडून लेदर क्रिकेटकडे येण्यासाठी काय करता येईल ते करावे लागेल असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी करत टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा एक चांगला उपक्रम असल्याचे कौतुकही आव्हाड यांनी केले.
आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, अमित सरैय्या, दिलीप बारटक्के, अनेक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *