मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नीचा आरोप
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी प्रताप चौधरी यांची त्यांच्याच घराजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर आता मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी थेट महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळेच आपल्या पतीचा जीव गेला असून, महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आपले पती आज जिवंत असते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी नेहा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवत या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात राहणारे प्रताप चौधरी यांची त्यांच्या राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य आरोपी रोहित शेलार याला अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद नसून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिलेली तक्रार कारणीभूत असल्याचे मृताच्या पत्नीने समोर आणले आहे.
परिसरातील संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी केडीएमसीकडे अधिकृतपणे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या.  या तक्रारींचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने आजतागायत त्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महापालिकेने वेळेत दखल घेऊन ते बांधकाम पाडले असते, तर आरोपींनी हे भयंकर पाऊल उचलले नसते आणि माझे कुंकू पुसले गेले नसते, असा उद्विग्न आरोप नेहा चौधरी यांनी केला आहे.
नेहा चौधरी यांनी केवळ महापालिकेवरच नाही तर पोलीस यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपी रोहित शेलार याला पोलिसांनी पकडले असले, तरी या संपूर्ण हत्येच्या कटात त्याला मदत करणारे आणि पाठीशी घालणारे इतरही अनेक चेहरे आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ एकाला पकडून तपास थांबवू नका, तर या हत्येचा कट रचणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या इतर सर्व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *