वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांचे वक्तव्य
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
कल्याण : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. असं काम केले पाहिजे, अशी भरारी घेतली पाहिजे की  आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्याविषयी अभिमानाची आनंदाची चमक दिसली पाहिजे. आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहण्यासाठी प्रयत्न करा, प्रेयसीच्या नाही असे स्पष्ट मत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या शैक्षणिक उपक्रम शाखा आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मुक्त संवाद साधून प्रेरणा देणाऱ्या काही सिनेमांची उदाहरणे देऊन त्यांना बोलते केले.  यावेळी त्यांनी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या बाबत माहिती देऊन जनजागृतीही केली. कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, आदर्श करिअर पॉईंट, नाशिकचे संचालक गोरक्ष सांगळे, अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, सरचिटणीस अर्जुन डोमाडे आणि कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड व्यासपीठावर उपस्थित होते.
मारुती आंधळे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यां समोर प्रेरणादायी विचार मांडले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात ‘दहावी बारावी नंतर काय?’ या विषयावर गोरक्ष सांगळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाचे तंत्र या विषयावर योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी  आणि पदवितर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रिक्षाचालक संतोष घुगे यांची मुलगी गौरी घुगे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण  होऊन वकील झाल्याबद्दल आणि वृत्तपत्र विक्रेत्या मंगल कांगणे आणि विलास कांगणे यांची मुलगी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाल्याबद्दल दोन्ही पालकांचा विशेष सन्मान यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे जयश्री दौंड आणि दिगंबर पालवे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रा.अर्जुन उगलमुगले आणि निकिता उगलमुगले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *