मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
कल्याण : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयामागे नक्की कोणते राजकारण होते, याबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला आणि काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात बोलत होते, असा दावा चव्हाण यांनी केला होता.
या राजकीय वादात आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट उडी घेतली असून सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शिंगावर घेतले आहे. मंदिराच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण बंद करा, असे सुनावत त्यांनी उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करण्याचे थेट आव्हान दिले आहे. या संपूर्ण वादामुळे भाजपामधील एका बड्या नेत्याकडे संशयाची सुई जात असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
डोंबिवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात सातत्याने बोलत होते, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर केला.
चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तो संबंधित व्यक्ती कोण आहे, याची पूर्ण माहिती रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि महायुतीतील इतर नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. हाच धागा पकडत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या वादात थेट उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्ट करत भाजपाला थेट शिंगावर घेतले आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या नावाने सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण तात्काळ बंद झाले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. आमचे पिंपळेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून खोटे बोलणाऱ्यांचा देव नक्कीच आवाज बंद करेल, असा टोला त्यांनी लगावला.
उगीचच हवेत संशयाच्या पुड्या सोडण्यापेक्षा, मंदिराला जागा मिळू नये म्हणून उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करा, अशी ठाम मागणी राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
000000000
