सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – भरत गोगावले
अलिबाग, दि. १२ (प्रतिनिधी) : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा अभिमान आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कामे वेळेत पूर्ण करून सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात योगदान द्यावे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडप व्यवस्था, भोजन व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सेवा सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्ट्रेचर आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. सर्पदंशासारख्या संभाव्य घटनांचा विचार करून आवश्यक उपचार साहित्य आणि औषधे उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून आरोग्य, पाणीपुरवठा, परिवहन, विद्युत व्यवस्था, खानपान, मंडप, स्वच्छता, शौचालये, राजशिष्टाचार आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून समितीनिहाय कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे.
बैठकीत विविध समित्यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा सादर केला. तसेच कोकणकडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या नियोजनाबाबत विविध सूचना मांडल्या. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
००००००००००००
