मुंबईला पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भिती
अविनाश उबाळे
ठाणे : कडक ऊन्हाळा वातावरणातील प्रचंड तापमान व पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणी पातळी ही पुर्णपणे खालावली आहे.धरणातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने भातसा तलावातील डोंगर,टेकड्या आता जलाशयातील पाण्याबाहेर डोकावू लागल्या आहेत.जून महिना उजाडला तरी अद्यापही पाऊस पडत नाही यंदा मान्सून लांबत असल्याचे चित्र दिसत आहे.पाऊस असाच लांबला गेला तर मग मात्र पुढील काळात पाणीकपातीला मुंबईला तोंड द्यावे लागेल अशी एकंदरीत परिस्थिती भातसा जलाशयाच्या पाणी पातळीवरुन दिसून येत सध्या धरणात केवळ २९.४५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जलाशयातील पाणी आटत चाल्याने पुढील काळात पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भीती आहे.सध्यास्थिती धरणातून मुंबई व ठाणे शहरासाठी पाणीपुरवठा महापालिकांच्या मागणीनुसार सुरु असून सध्या सिंचनासाठी सोडण्यात येणारे भातसा उजवा कालव्याचे पाणी देखील बंद करण्यात आलेले आहे.तर जलाशयावरील १५ मेगाव्हॅट वीज केंद्र ही बंद करण्यात आलेले आहे.मुंबईला सर्वात जास्त पाणीपुरवठा करणारे धरण म्हणून भातसा जलाशयाची ओळख आहे.भातसा तलावातील पाणी जरी कमी झालेले असले तरीही जून अखेरीपर्यंत मुंबई व ठाण्याला तलावातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे.एवढा पुरेसा पाणीसाठा भातसा धरणात शिल्लक असल्याचा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.शहापूर तालुक्यातील भातसा,तानसा, मोडकसागर,मध्यवैतरणा,धरणांतून प्रतिदिन ३ हजार ९०० एमएलडी इतके पाणी मुंबई ,व ठाणे शहरांना पुरविले जाते यात सर्वाधिक भातसा धरणातून प्रतिदीन जवळपास २२०० एमएलडी पाणी मुंबई व ठाणे महानगराला पुरविण्याची जबाबदारी भातसा जलाशयावर आहे.या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमिटर आहे.तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमिटर आहे.भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमिटर आहे.सध्यास्थितीत धरणाची पाण्याची पातळी यंदा १११.०२ मीटर इतकी आहे.तर जलाशयात उपयुक्त साठा यंदा २७७.४९५ दशलक्ष घनमीटर इतका आहे.
00000
