सत्ताधाऱ्यांना अमित म्हात्रेंचा राजीनाम्याचा इशारा
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, परिवहन, पाणीपुरवठा, वीज, फुटपाथ आणि कचरा व्यवस्थापनासह अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारत विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करू, असा इशारा डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांनी दिला.
डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव वर्षा शिखरे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे, एकनाथ म्हात्रे, संकेत लोके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा कोणताही अंकुश राहिलेला नसल्याचा आरोप करत म्हात्रे म्हणाले की, फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षातील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाच मोर्चे काढावे लागत आहेत. महापौर स्वतः फेरीवाल्यांकडून खरेदी करत असल्याचे चित्र दिसत असल्याने सत्ताधाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी ई-बस प्रकल्प अपयशी ठरल्याचा आरोप केला. बसेससाठी पुरेशा चार्जिंग सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यांची अवस्था खराब असताना कचरा वाहतुकीसाठी छोट्या गाड्या आणल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. पॉड टॅक्सी सारख्या संकल्पनेद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भागशाळा मैदानाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या भाजपच्या चिन्हावर आक्षेप घेत त्यांनी, सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांवर कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित फलक तातडीने हटवावेत, अन्यथा काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला.
कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत अनेक खासगी गृहसंकुले स्वतः कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे राबवत असताना त्याचे श्रेय केडीएमसी घेत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याबाबत विचारले असता, “गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे,” अशी प्रतिक्रिया देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर पक्षांतील काही पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करत याबाबतचा अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी नमूद केले. येणाऱ्या काळात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्याबरोबरच महापालिका सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली जाईल, असेही अमित म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *