आमदार संजय केळकर, निरंजन डावखरेंची प्रमुख उपस्थिती
ठाणे, २० (प्रतिनिधी) : भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ठाणे महापालिकेतील भाजपच्या दालनातून ठाणेकरांच्या हिताची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त करीत दोन्ही आमदारांनी मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील यांचीही उपस्थिती होती. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले असून, पक्षाच्या सदस्यसंख्येनुसार महापालिकेकडून प्रशस्त दालन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या तळमजल्यावर गटनेत्यांसाठी दालन देण्यात आले. या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
ठाणे शहरातील नागरिकांनी भाजपला कौल दिला. यापुढील काळात गटनेता दालनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील जनहितांच्या कामांना न्याय मिळेल. ठाणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.
ठाण्यातील २५ लाखांहून अधिक नागरिकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी भाजप कार्यरत आहे. महापालिकेकडून जनतेला नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही दक्ष राहणार आहोत. महापालिकेसंदर्भातील विविध नागरी सुविधांसाठी नागरिकांनी गटनेते कार्यालयाबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन गटनेते मुकेश मोकाशी यांनी केले.
या वेळी भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक व माजी गटनेते संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, नगरसेवक सुनेश जोशी, दीपक जाधव, सिताराम राणे, वैभव कदम, सुरेश कांबळे, विकास पाटील, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, नंदा पाटील, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, उषा वाघ, वेदिका पाटील, अनिता ठाकूर यांच्यासह भाजपाचे ठाण्यातील सरचिटणीस विक्रम भोईर, सचिन पाटील, समिरा भारती, पदाधिकारी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, अश्विन शेट्टी, स्वप्नाली साळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
