महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, विवेक बाद फेरीत
 चषक कबड्डी स्पर्धा
मुंबई, दि. २0 (क्री.प्र.) क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल), ठाणे महानगर पालिका, मीरा-भायंदर महानगर पालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँकेने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, स्वराज्य स्पोर्ट्स, शिवशक्ती आणि विवेक स्पोर्ट्स क्लबने गटविजेतेपद पटकावत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत दुसर्‍या दिवशी मॅटवरच्या कबड्डीचा अस्सल व्यावसायिक संघांचा थरार हजारो कबड्डीप्रेमींना याची देही अनुभवता आला. कालच प्रभादेवीत बाजी मारलेल्या बीपीसीएलने आज मैदानात उतरताच आधी रिझर्व्ह बँकेचे ३६-१८ असे डिपॉजिट जप्त करत खणखणीत विजय मिळवला. बीपीसीएलच्या मिलन दहिया आणि प्रसाद दिघोळेच्या खेळापुढे रिझर्व्ह बँकेचे काहीएक चालले नाही. या एकतर्फी विजयानंतर बीपीसीएलने ठाणे महानगर पालिकेविरुद्धचा संघर्ष १४-१३ अशा एका गुणाने जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ठाणे महानगर पालिकेने आपल्या दुसर्‍या सामन्यात रिझर्व्ह बँकेचा ४६-३४ असा धुव्वा उडवत अंतिम आठ संघात प्रवेश केला.
बीपीसीएलपाठोपाठ आयएसपीएलने आपल्या दुसर्‍या सामन्यात संत सोपान काका बँकेला ३९-२४ असे नमवत अ गटाचे विजेतेपद पटकावून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, तसेच मुंबई पोस्टल आणि सीजीएसटी यांच्यातील अटीतटीचा सामना पोस्टलने १६-१५ असा जिंकला आणि इ गटातून बाद फेरीत धडक मारली.
क गटात मिरा भायंदर पालिकेने मिडलाइन रायगडविरुद्धची साखळी लढत ३७-३६ अशी जिंकत बाद फेरी गाठली. युनियन बँक आणि मुंबई बंदर यांच्यातील सामना युनियन बँकेने १६-१४ असा जिंकत ड गटातून बाद फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या गटातही जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पुण्याच्या राजमाता जिजाऊने आपले दोन्ही साखळी सामने सहज जिंकले. पहिल्या साखळी सामन्यात श्रीराम संघाचा ३५-१० असा फडशा पाडला तर दुसर्‍या सामन्यात भांडुपच्या स्नेहविकास मंडळाची ४०-६ अशी धुळधाण उडवली. या दोन्ही सामन्यात  महेश्वरी वाघ आणि निमिता पडवळ यांचा वेगवान खेळ पाहायला मिळाला. नंदूरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने डॉ. शिरोडकर क्लबचा ४६-२४ असा सहज पराभव केला. समृद्धी कोळेकर, हर्षदा सोनावणे, हर्षदा हंडोरे आणि ईश्वरी कोंढाळकर यांनी तुफानी चढाया-पकडींचा खेळ करत आपल्या संघाला मोठे विजय मिळवून दिले. मुंबईच्या शिवशक्ती महिला संघानेही स्वस्तिक आणि पतंगराव कदम संघाचा दारुण पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. विवेक स्पोर्ट्स क्लबनेही संजना पोळ आ्िण जीवा श्रीरंगन यांच्या खेळाच्या जोरावर दोन्ही साखळी लढती आरामात जिंकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *