१ जूनपूर्वी गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे नियोजन
ठाणे : गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने आता मार्केट परिसराच्या पुनर्वसनासाठी ‘मिशन क्लिनिंग’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तब्बल ९० कामगार दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर राडारोडा हटविणे आणि साफसफाईचे काम सुरू असून १ जूनपर्यंत १५५ गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
गुरुवारी पहाटे गावदेवी भाजी मार्केटला भीषण आग लागून संपूर्ण परिसर हादरला होता. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (४२) आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (५५) यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तीन अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षण रकमेत वाढ करण्याबाबतही पालिका लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नुकसानग्रस्त गाळ्यांचे पंचनामे सुरू असून त्यानंतर नुकसान भरपाई प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
सध्या गावदेवी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात साफसफाई सुरू आहे. त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिट अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी आणि विद्युत यंत्रणेची कामे पूर्ण झाल्यानंतर गाळेधारकांना पुन्हा त्याच जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन केंद्र अधिकारी सुजीत पाष्टे (४०), सहाय्यक केंद्र अधिकारी प्रशांत मुथ्या (४३) आणि अग्निशमन प्रणेता समीर जाधव (४३) यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
०००००००
