३४वी एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा
मुंबई : ठाणे केंद्राचा झंझावात पहिल्या डावात १३८ धावांवर रोखल्यानंतर चर्चगेट केंद्राने ७ बाद ३७० धावांचा डोंगर उभा करत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. माटुंग्यातील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, आरूष कोल्हेने केलेली १६३ धावांची शानदार खेळी चर्चगेट केंद्राच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
प्रथम फलंदाजी करताना ठाणे केंद्राचा पहिला डाव पहिल्या दिवशी १३८ धावांत आटोपला. प्रत्युत्तरादाखल, चर्चगेट केंद्राने दुसऱ्या दिवशी रविवारी १२४ षटकांत ७ बाद ३७० धावा उभारल्या. आरूष कोल्हेने अप्रतिम १६३ धावा करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. चर्चगेट केंद्राच्या विजयात निखिल गुरव (७७) आणि शार्दुल फागरे (६८) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. उत्कृष्ट खेळीबद्दल आरूष कोल्हे याला अंतिम फेरीतील सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, १९९१मध्ये कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत वासिम जाफर हा खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव उन्मेष खानविलकर तसेच एलआयसीचे प्रादेशिक व्यवस्थापक आय. प्रभाकरन उपस्थित होते.
धावफलक :
ठाणे केंद्र : ३५.१ षटकांत सर्वबाद १३८ धावा
(पार्थ राणे ४६, अथर्व गावडे ३०; जय म्हात्रे ३/१६, निखिल गुरव ३/२७)
पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध
वि. चर्चगेट केंद्र : १२४ षटकांत ७ बाद ३७० धावा
(शार्दुल फागरे ६८, आरुष कोल्हे १६३, निखिल गुरव ७७)

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी :
अंतिम सामनावीर : आरूष कोल्हे (चर्चगेट केंद्र)
सर्वोत्तम फलंदाज : शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र)
सर्वोत्तम गोलंदाज : राजवीर लाड (एमसीए अकादमी केंद्र)
सर्वोत्तम यष्टिरक्षक : तन्मय मालुसरे (ठाणे केंद्र)
उदयोन्मुख वेगवान गोलंदाज : आरव सेठी (वाशी केंद्र)
उदयोन्मुख खेळाडू : जय म्हात्रे (चर्चगेट केंद्र)
उदयोन्मुख फलंदाज : शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र)
हॅट्ट्रिक हिरो : श्लोक यादव (घाटकोपर केंद्र)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आरुष कोल्हे (चर्चगेट केंद्र)
व्ही. व्ही. करमरकर पुरस्कार : शरद कद्रेकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *