नगरसेविका नम्रता कोळी यांची लक्षवेधी
ठाणे : गावदेवी मंडईतील आगीच्या पार्श्वभूमीवर ठाणे अग्निशमन दलातील सुविधा व क्षमता आणि शहरातील सरकारी व महापालिकेच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेबाबत भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे लक्षवेधी सूचना सादर केली आहे. तसेच आगामी महासभेत चर्चा करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे.
गावदेवी मंडईतील दुर्घटनेत अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी व एका सुरक्षारक्षकाला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर गावदेवी मंडईत आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन सुविधा नसल्याचे लक्षात आले होते. ठाणे शहरात वेगाने नागरीकरण होत असून बहुमजली इमारतींचे जाळे निर्माण झाले आहे. या परिस्थितीत ठाणे अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता आहे. एकीकडे अग्निशमन दलात अनेक पदे रिक्त असताना, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलावर ताण येत आहे. बदलत्या काळानुसार आग लवकर आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल सुसज्ज असण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीकोनातून महासभेत चर्चा करावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे.
गावदेवी मंडईतील दुर्घटनेनंतर महापालिका मुख्यालयासह इतर कार्यालयीन संकुले, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व महापालिकेची इतर रुग्णालये, आरोग्य केंद्रे, शहरातील इतर सर्व भाजी मंडई आणि विविध इमारतींमधील फायर सुरक्षांचा आढावा घ्यावा. महापालिकेच्या प्रत्येक संकुलाचे फायर ऑडिट करणे गरजे आहे. त्यादृष्टीकोनातूनही लक्षवेधी सूचनेवर चर्चा करावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *