मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा
श्रेयसची घातक गोलंदाजी; ४ बळी घेत वियोमला फायनलमध्ये पोहोचवले
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर सुरू असलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’त आता अंतिम सामन्याची रंगत शिगेला पोहोचली आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने अत्यंत थरारक लढतीत ओर्नेट क्रिकेट क्लबवर शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी निसटता विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने एसएसए स्टायकर्सवर १४ धावांनी दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यात ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने ओर्नेट क्रिकेट क्लबवर ४९-४५ असा थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ओर्नेटच्या आकाश आणि रजनीश यांनी २४ धावांची दमदार सुरुवात करून संघाला भक्कम पाया रचून दिला. त्यानंतर अभिजित आणि कमलेश यांनी १४ धावा जोडल्या, तर अक्षिश आणि अश्विन यांनी १२ धावांची भर घातली. मात्र शेवटच्या जोडीतील घसरणीमुळे ओर्नेटला ४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. ४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीकडून मोनू आणि मयांक यांनी १७ धावांची सुरुवात केली. त्यानंतर रोहित आणि अहमद यांनी १८ धावा फटकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑसम अंधेरीने ४९ धावा करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने एसएसए स्टायकर्सवर ४२-२८ असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या वियोमने सुरुवातीपासून एसएसएवर दबाव निर्माण केला.
एसएसएच्या पहिल्या जोडीतील नितीश आणि सिकंदर यांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर विल्सन आणि विजय यांनी १४ धावा केल्या, तर नितीन आणि विश्वनाथ यांनी २९ धावांची आक्रमक भागीदारी केली. मात्र शेवटच्या जोडीतील सुयोग आणि संदेश यांना श्रेयस आणि शुभम यांच्या अचूक गोलंदाजीसमोर मोठा फटका बसला आणि संघ २८ धावांवर रोखला गेला. वियोमकडून श्रेयसने ४ बळी घेत सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी केली, तर रोहनने २ बळी घेतले. प्रसाद आणि शुभम यांनी प्रत्येकी १ बळी घेत महत्त्वाचे योगदान दिले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अनिकेत माडीये आणि रोहन गावडे यांनी १५ धावांची सावध सुरुवात करत वियोमला स्थिरता मिळवून दिली. त्यानंतर श्रेयस वैद्य आणि अजित सेठी यांनी १० धावांची भर घालत विजयाचा पाया मजबूत केला. कर्णधार ओमकार पाटोळे आणि प्रसाद आंब्रे यांनी संयमी फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. अखेरीस शुभम गुरव आणि सिद्धेश घोगरे यांनी ७ महत्त्वाच्या धावा जोडत संघाला १४ धावांनी शानदार विजय मिळवून दिला.
आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वियोम फाऊंडेशन आणि ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी जबरदस्त लढत रंगणार असून, क्रिकेट प्रेमींमध्ये या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
