कुमार-मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने ओम समर्थ भा. व्या. मंदिर आयोजित कुमार-मुली (ज्युनिअर- १८ वर्षाखालील) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२६-२७ मध्ये आज रंगलेल्या सामन्यांनी मैदान अक्षरशः दणाणून गेले. काही सामने एकतर्फी झाले, तर काही सामन्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीमुळे प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला. श्री समर्थ व्यायाम मंदिर, वैभव स्पोर्ट्स क्लब, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांनी शानदार विजय नोंदवत स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला.
वैभव स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा ६-२ (मध्यंतर ४-०) असा ४ गुणांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. वैभव स्पोर्ट्स क्लबच्या मुग्धा देवळेकर (दोन्ही डावात नाबाद ७, २.२० मि. संरक्षण व २ गुण), तन्वी मटकर (३.४० मि. संरक्षण व १ गुण) व पूर्वा महाडिक (१ मि. संरक्षण व २ गुण), यांनी चमकदार खेळ करत निर्णायक भूमिका बजावली. तर पराभूत अमर हिंद मंडळाकडून प्रांजल पताडे (३.३०, नाबाद ३ मि. संरक्षण), तनया शिंदे (२.१०, १.३० मि. संरक्षण), व आर्या पाटील (२.३० मि. संरक्षण) यांनी झुंजार खेळ केला, मात्र त्यांना आपल्या संघाला पराभवापासून वाचवता आले नाही.
श्री समर्थ व्यायाम मंदिरने आर्य सेनाचा ८-३ (मध्यंतर ५-१) असा ५ गुणांनी दणदणीत पराभव केला. श्री समर्थच्या खुशी यादव (७.१०, ३ मि. संरक्षण व १ गुण), ग्रंथा वारघडे (नाबाद १.५०, ५ मि. संरक्षण व २ गुण) व सोनम शेलार (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी शानदार कामगिरी करत विजय मिळवून दिला. तर पराभूत आर्य सेनाच्या अन्वी काकडे (नाबाद २.००, २.२० मि. संरक्षण), पुष्पांजली यादव (३ मि. संरक्षण व १ गुण), सायली जाधव (१.३०, २.३० मि. संरक्षण), दक्षता घोलप (२.०० मि. संरक्षण व १ गुण), यांनी दिलेली कडवी झुंज व्यर्थ गेली.
यजमान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संघाने सरस्वती कन्या संघाचा ५-८ (मध्यंतर २-२, २-२ व ४-१) असा चुरशीच्या सामन्यात जादा डावात ३ गुणांनी पराभव करत विजय मिळवला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्याने वातावरण तापले होते. ओम समर्थच्या अवनी पाटील (५.३०, ६ मि. संरक्षण व ३ गुण), जिज्ञासा गायकवाड (३, ५.१० मि. संरक्षण व २ गुण), श्रीया ताम्हणकर (३.४०, नाबाद ३ मि. संरक्षण व १ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजात विजय खेचून आणला. तर पराभूत सरस्वती कन्याच्या वैदवी बटावले (५, ४.२०, २ मि. संरक्षण व १ गुण), हर्षला सकपाळ (नाबाद २.३०, नाबाद २.४०, ३.२० मि. संरक्षण व १ गुण), राधिका कोंडुसकर (१.३०, ३.३० मि. संरक्षण व १ गुण), आणि प्रतीक्षा मोरे (२ मि. संरक्षण) यांना विजयावर शिक्कामोर्तब करण्यात अपयश आले.
ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिर ब चा १६-०४ (मध्यंतर १६-२) असा १ डाव व १२ गुणांनी धुव्वा उडवत प्रभावी विजय नोंदवला. ओम साईश्वरच्या आर्या गोरीवले (५ मि. संरक्षण व २ गुण), यशस्वी कदम (नाबाद ४ मि. संरक्षण व २ गुण), गायत्री तांबे (३.५० मि. संरक्षण व २ गुण), निर्मिती परब (नाबाद ३.१० मि. संरक्षण) व प्रांजल पाठक (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयात दमदार कामगिरी केली.
