Unit-11
कल्याण : महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा टप्पा ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक कल्याण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. “कुस्तीचा विकास… खेळाडूंचा सन्मान… महाराष्ट्राचा अभिमान” या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या चळवळीला ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वस्ताद, पैलवान, कुस्ती आयोजक आणि कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. कुस्ती क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, पैलवानांचे हक्क, वस्तादांचा सन्मान आणि पारंपरिक कुस्तीच्या संरक्षणासाठी ही संघटना ताकदीने काम करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पैलवान संग्राम कांबळे यांनी संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि आगामी राज्यव्यापी बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ठाणे जिल्ह्यात संघटनेची मजबूत पायाभरणी करण्यात आली. यावेळी सर्वांच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती संघटना ठाणे जिल्हाप्रमुखपदी पैलवान जितेंद्र भगत यांची निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातून सुरू झालेली ही चळवळ आता ठाणे जिल्ह्यात भक्कमपणे रुजली असून, येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करून कुस्ती क्षेत्रासाठी पारदर्शक, सक्षम आणि शाश्वत व्यासपीठ उभारले जाईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलेले ठाणे जिल्ह्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद चैनू लोखंडे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे, जय मल्हार कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष गोरख खळदकर, ननगरसेवक अविनाश गायकवाड, देवीदास जाधव, नंदू पाटील, विनोद पाटील, दिनेश थळे, संतोष बोधले, राजू चौधरी, नगरसेवक जयवंत भोईर, संकेत भोईर, महाराष्ट्र पोलीस नवनाथ शिर्के, वस्ताद, पैलवान, कुस्तीप्रेमी, आयोजक, मान्यवर आणि महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले.
0000000000
