मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ व बदनामी करणारी विधाने करण्याची स्पर्धा भारतीय जनता पक्षात लागलेली आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे हे त्यातील एक ‘पात्र’ आहे. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्यावर बोलण्याची औकात व उंची नितेश राणेंची नाही, त्यामुळे बोलताना ‘जीभेला लगाम घाला’, अन्यथा तुमच्याच भाषेत तुमची लायकी दाखवू, असा इशारा मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिला आहे.
भाजपाचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात, विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल तर ते सातत्याने खालच्या पातळीवरची भाषा वापरतात, नितेश राणे यांच्यावर झालेले ‘संस्कार’ यातून दिसून येतात, त्यातच भाजपाच्या ‘दावणीला जुंपल्यामुळे’ आपले ‘कर्तृत्व’ सिद्ध करण्यासाठी घाणेरडी भाषा वापरणे, शिवराळ बोलणे, असे त्यांना करावे लागते. भाजपामध्ये जो जास्त प्रमाणात विरोधी पक्षांच्या नेत्यांना शिवीगाळ करेल त्यालाच ‘बक्षिसी’ मिळते. ठाकरे व गांधी कुटुंबावर बोलले की प्रसिद्धीही मिळते व ‘आका’कडून बक्षिसही मिळते, म्हणून आपल्या पक्षातील ‘मोगँम्बो’ला खुश करण्यासाठी नितेश राणे सारखे सुमार दर्जाचे लोक अशी वक्तव्ये करतात. पण आमच्या नेत्यांवर जर अशा पद्धतीने चुकीचे व अवमानकारक बोलाल तर तुम्हालाही तुमची लायकी दाखवावी लागेल.
नितेश राणे यांचे पिताश्री व ते स्वतः १२ वर्षे काँग्रेस पक्षातच होते. शिवसेनेने हाकूलन दिल्यानंतर काँग्रेस पक्षानेच त्यांना आश्रय दिला, त्यावेळी नितेश राणेंना राहुल गांधी पाकिस्तानी एजंट वाटले नाहीत का? ज्या पक्षाने मोठे केले, अनेक पदे दिली त्यांच्यावरच टीका करायची ही राणे कुटुंबाची विकृती आहे. किमान आपल्याला पगार किती? आपली उंची किती? आणि आपण बोलतो किती? याचा तरी सारासार विचार करावा. मविआचे सरकार असताना एक ‘एफआयआर’ झाला तर १५ दिवस बिळात जाऊन लपून बसणाऱ्या नितेश राणेंनी जरा जपून बोलावे, एवढेच अन्यथा ‘चुकीला माफी नाही’, असे सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *