मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना अधिक सक्षम व पारदर्शक सेवा देण्यासाठी तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भांडुप परिमंडलात ‘ग्राहक तक्रार निवारण मंच’ व स्मार्ट मीटरिंग या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या संकल्पनेतून व मुख्य अभियंता संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
भांडुप परिमंडलातील ठाणे मंडळाचे कार्यक्रम ठाणे मंडळ कार्यालयाच्या सभागृहात, वाशी मंडळाचे कार्यक्रम भांडुप परिमंडल कार्यालयाच्या सभागृहात तर पेण मंडळाचे कार्यक्रम पेण मंडळ कार्यालयात पार पडला. ग्राहकांच्या तक्रारींवर एक संरचित प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करणे, तसेच “स्मार्ट मीटरिंगमधील आयटी/कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी” चे ज्ञान सामायिक करण्यासाठी  एक सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यात आले. भांडुप परिमंडलातील तिन्ही मंडळातून उपविभागीय अधिकारी, लेखा सहाय्यक व समन्वयक म्हणून मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रादेशिक कार्यालयातील विधी सल्लागार  सत्यजित पवार व कार्यकारी अभियंता ज्ञानेश पानपाटील यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाची कार्यपद्धती, तक्रार निवारणाचे स्तर गतिमान करण्यासाठी अंमलबजावणी, कायदेशीर बाबी व ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत व प्रभावी निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, स्मार्ट मीटरिंग योजनेची प्रभावी अंमलबजावणी, त्याची तांत्रिक कार्यपद्धती व टीओडी मीटरचे ग्राहकांना होणारे फायदे याविषयी सखोल माहिती दिली. या विशेष उपक्रमामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येणार आहे, असे मत यावेळी प्रशिक्षणार्थी यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *