मुंबई : जी/उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ पर्यवेक्षकांकडून कथित गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींमुळे महापालिका प्रशासनाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने केला आहे. याबाबत तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, एका कनिष्ठ पर्यवेक्षकाकडून गर्दुल्ल्यांकडून महापालिका कामगारांचे काम करून घेत असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये व यू-ट्यूब चॅनेलवर पुराव्यासह प्रसारित झाले आहे. या प्रकरणात कनिष्ठ पर्यवेक्षक श्रीमती राधिका अहिरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कामगारांचे आर्थिक नुकसान केले जात असल्याच्या तक्रारी असून, कामगारांशी उध्दट वर्तन करणे, नियमित कामकाज न करता घरी जाणे, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी कामगार व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे वारंवार केल्या असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी वर्गाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची प्रतिमा मलीन होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करण्याबाबत परिपत्रक अस्तित्वात असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही विभागांमध्ये पाच-पाच वर्षे एकाच ठिकाणी कनिष्ठ पर्यवेक्षक कार्यरत असून, मुकादमांच्या बदल्याही केल्या जात नसल्याचे संघटनेने निदर्शनास आणले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांकडून चुकीचे धोरण राबवले जात असून, यामागे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने बैठक आयोजित करावी व बैठकीची तारीख आणि वेळ लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी प्रमुख अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
