मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई बाबत काल प्रभादेवी येथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने रस्ता रोको करून जोरदार आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू अशी माहिती येथील अन्या येथील रहिवाशांनी दिली. सुमारे ६०० रहिवासी आजही स्वतःच्या पैशाने भाड्याच्या घरात राहत असून मागील चार वर्षांपासून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहेत.
या कालावधीत सर्व रहिवाशांनी मिळून सुमारे २० कोटी रुपये भाडे, डिपॉझिट, स्थलांतर आणि इतर खर्चांवर स्वतःच्या खिशातून खर्च केले आहेत. अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढला असून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य खालावले आहे. काही रहिवासी आज आपल्यात नाहीत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागामालक आणि यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून न्यायालयीन केसेसमुळे सामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पुनर्विकासाबाबत २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रत्येक रहिवाशाला ५८० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक बैठका, भेटी आणि घोषणांनंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रहिवाशांनी आपल्या व्यथा आणि चार वर्षांचा संघर्ष जनतेसमोर मांडण्यासाठी परिसरात एक साधा बॅनर लावला होता. त्या बॅनरवर कोणताही राजकीय मजकूर किंवा पक्षाचे नाव नव्हते. तरीही काही मिनिटांत पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बॅनर हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिला रहिवाशांसह सर्व भाडेकरूंनी तीव्र विरोध केल्यानंतर हा प्रयत्न थांबवण्यात आला. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
आज या ६०० रहिवाशांचा एकच सवाल आहे की आश्वासनं अनेक मिळाली, पण न्याय आणि स्वतःचे घर नेमके कधी मिळणार. या संघर्षाला पाठिंबा दर्शवत लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन घेऊन जोपर्यत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिली.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *