मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावूनही संबंधितांनी त्याची दखल न घेतल्याने ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम नियंत्रण व निष्कासन) संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.
जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत घर क्रमांक १६६, ऐरोली गाव येथे हितेश किशोर कोटकर यांनी बांधकाम परवानगीच्या व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये १६ एप्रिल २०२६ रोजी संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली होती. स्वतःहून बांधकाम हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
यानंतर साधना पाटील, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, ऐरोली यांच्या नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत संबंधित अनधिकृत बांधकाम अंशतः निष्कासित करण्यात आले. कारवाईदरम्यान जी विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, १६ मजूर, ३ ब्रेकर, १ गॅस कटर तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भविष्यातही अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
