नाशिक दौऱ्यात आदित्य ठाकरे यांचा घणाघात
हरिभाऊ लाखे
नाशिक – शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये मागील आठवड्यात शिवसंवाद मेळावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही नाशिकचा दौरा करुन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना हात घातला पाहिजे, प्रश्नांचा पाठपुरावा कसा केला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतानाच पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशावर टीका केली.
कुंभमेळ्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, कुंभमेळ्यातील कामांचे कंत्राट कोणाला देण्यात येत आहे, त्याचा नाशिकला काही फायदा आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये सर्वत्र खोदकाम करुन ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे यशस्वी होतील का, याची खात्री सरकार देणार आहे काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
जागतिक परिस्थिती वेगळी असली तरी या सरकारने मागील काही वर्षात आर्थिक परिस्थितीवर असे काही करुन ठेवले आहे की, त्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागत आहे. पैसे नाही दिले तरी कंत्राटदार खोदकाम सोडून देणार नाही, याची हमी सरकार देऊ शकणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले.
कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये होणाऱ्या रिंगरोडकरिता होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडला होता. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाही. परंतु, त्याच्या मागण्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी ? हे पुस्तक वाचले असते तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय शिक्षा दिली होती, याचा या गद्दारांना पळताना चारदा विचार करावा लागला असता. त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून देशात आणि राज्यात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, रोजगार किती आहेत, सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली, या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली, या प्रश्नांचा विचार करावयास हवा. असे प्रश्न अधिवेशनात मांडावयास हवेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी अजून कशाप्रकारे प्रश्नांची मांडणी करावयास हवी, यासंदर्भात नगरसेवकांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
इतर पक्षांमागे लागतात, तसे भाजप हे काॅक्रोच जनता पार्टीमागे लागले आहेत. काॅक्रोच जनता पार्टीला समाज माध्यमात बंदी घालावीशी भाजप सरकारला वाटले. यावरुन विचार करा त्यांच्यात किती भीती आहे. भाजपमध्ये भीती असल्याचे आणि जनतेमध्ये आक्रोश असल्याचे दिसून आले आहे. भाजपविरोधात कोणी बोलले की लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्यात येतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी काॅक्रोच जनता पार्टीशी संबंधित विषयावरुन लोकांमध्ये किती आक्रोश आहे, हे लक्षात येत असल्याचे सांगितले. सरकारमधील मंत्री सर्वत्र पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतात. परंतु, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाले आहेत. इंधन मिळविण्यासाठी कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत. रांगा लागल्या आहेत. राज्यातील ही परिस्थिती सरकारमध्ये असूनही जर मंत्र्यांना माहीत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.
कोट
“भाजपमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून जनतेमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. भाजपविरोधात कोणी आवाज उठवला किंवा सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले की, लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.” – आदित्य ठाकरे
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *