‘बेकायदेशीर नळ जोडण्या तोडा, नियमित पाणी द्या’ची जोरदार मागणी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त महिला आणि नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “बेकायदेशीर नळ जोडण्या बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंबिवलीतील अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ, साईकृपा चाळ, धर्मात्मा नगर, ज्योतिर्लिंग चाळ आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत असून घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे. सकाळपासून पाण्याच्या प्रतीक्षेत राहूनही नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर नळ जोडण्या झाल्याचे सांगितले. काही अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महिलांनी केला. “आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र बेकायदेशीर जोडण्यांमुळे पाण्याचा दाब कमी होत असून आमच्या भागात पाणीच पोहोचत नाही,” असे रेशमा बोत्रे आणि जयश्री ढेकळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश देत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *