मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा
 महिलांमध्ये रणरागिणी क्लबचा दणदणीत विजय
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट्स टर्फवर रंगलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्याने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर बसवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचकारी लढतीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबवर अवघ्या १ धावेने (३३-३२) मात करत विजेतेपद पटकावले. विजयाचा क्षण येताच मैदानावर प्रेक्षकांनी जल्लोष करत उत्सव साजरा केला. याआधी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी (९८-३७) दणदणीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेत प्रथमच नाणेफेक गमावल्याने वियोम फाऊंडेशनला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्याचा संघाला मोठा फटका बसल्याचे कर्णधार ओमकार पाटोळे यांनी सामन्यानंतर सांगितले. वियोमच्या पहिल्या जोडीतील सिद्धेश घोगरे (५) आणि श्रेयस वैद्य (६) यांनी ११ धावा केल्या. मात्र दिपेनने श्रेयसला बाद करत ५ धावांचा फटका दिला. दुसऱ्या जोडीतील ओमकार पाटोळे (-४) आणि रोहन गावडे (२) यांना मोठी कामगिरी करता आली नाही. ओमकारला आदिलने दोनदा बाद करत वियोमच्या धावसंख्येला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनिकेत माडीये (७) आणि प्रसाद आंब्रे (३) यांनी १० धावांची भर घातली. शेवटच्या जोडीतील शुभम गुरव (५) आणि अजित सेठी (८) यांनी महत्त्वपूर्ण १३ धावा जोडत वियोमला ३२ धावांपर्यंत पोहोचवले.
३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीची सुरुवात खराब झाली. मुसा सय्यद (०) आणि मोनू यादव (-४) यांना रोहन गावडेच्या अचूक गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. त्यानंतर संतोष जाधव (०) आणि अहमद (६) यांनी संघर्ष केला, मात्र सतत विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. तिसऱ्या जोडीतील दिपेन दांडेकर (१८) यांनी दमदार खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटच्या जोडीला विजयासाठी १६ धावांची गरज असताना रोहित खरात (१७) आणि आदिल सय्यद (-१) यांनी जबरदस्त धैर्य दाखवत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत रोहितने ऑसम अंधेरीला थरारक विजय मिळवून दिला.
महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने एकतर्फी वर्चस्व राखत शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबवर ६१ धावांनी विजय मिळवला. रणरागिणीकडून नाजूका (२७), प्राजक्ता (२४), प्रिया (११) आणि दृष्टी व पूजा (प्रत्येकी ११) यांनी शानदार फलंदाजी केली. तर शक्तीकडून लावण्या (१३) आणि आचल (११) यांनी झुंजार लढत दिली.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) म्हणून श्रेयस वैद्य (वियोम फाऊंडेशन) याची निवड करण्यात आली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : दिपेन दांडेकर (ऑसम अंधेरी) व सर्वोत्कृष्ट गोलंदाज : रोहन गावडे (वियोम फाऊंडेशन) ठरले.   स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक यशवंत किल्लेदार व नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बाळ वाडवलीकर (माजी क्रीडा अधिकारी, आरसीएफ), विलास पाटील (माजी जनरल व्यवस्थापक, आरसीएफ), संजय चुरी (पीडीजी, लायन्स क्लब ऑफ मुंबई), जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, वरदा चुरी (कार्याध्यक्षा – पार्क क्लब), दतात्रय वेदक (माजी अध्यक्ष – मुंबई महिला क्रिकेट), विनया तोरसकर (अध्यक्षा – वियोम फाऊंडेशन), संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर व इनडोअर क्रिकेटचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजिंक्य नाईक यांनी, “मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देणे हेच आमचे ध्येय आहे. क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन कायम पुढाकार घेईल,” असे सांगितले. तर यशवंत किल्लेदार यांनी, “आजची मुले मोबाईल आणि मनोरंजन विश्वात अधिक रमली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले. विजेत्या ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबला रु. २५,०००, चषक आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या वियोम फाऊंडेशनला रु. १५,०००, चषक आणि रौप्यपदक प्रदान करण्यात आले.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *