भुजबळ फार्मवर शेतकऱ्यांचे आंदोलन
हरिभाऊ लाखे
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडमध्ये एकाही मंत्री वा त्यांचे निकटवर्तीय, बिल्डर्स आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या जमिनी जात नसल्याकडे लक्ष वेधत कुंभमेळ्याच्या नावाखाली बिल्डरांसह हितसंबंधितांच्या फायद्यासाठी रिंग रोड बनवला जात असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे. नाशिक रिंग रोडची मोजणी मध्यंतरी वादात सापडली होती. या प्रश्नावर स्थानिक तीनही मंत्र्यांनी भूमिका मांडलेली नाही. बाधित शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या निवास स्थानासमोर दाद मागो आंदोलन केले. यावर आता मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक रिंग रोड आणि एमआयडीसी भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे गोदा काठावर आमरण उपोषण सुरू आहे. दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी मंत्री भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. सकाळपासून भुजबळ फार्म परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. कांदा प्रश्नांसंदर्भातील बैठकीसाठी मंत्री भुजबळ यांना दिल्लीला जावे लागल्याने ते नाशिकमध्ये नव्हते. मात्र, त्यांच्या स्वीय सहाय्यकांसमवेत शेतकरी शिष्ट मंडळाने चर्चा केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतील सर्व आश्वासनांची पूर्तता शासनाच्या संबंधित विभागांनी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मंत्री भुजबळ यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
भुजबळ हे पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक महामार्ग व मोठे विकास प्रकल्प झाले. त्यामुळे रिंग रोडसारख्या महत्वाच्या प्रकल्पात शेतकरी हित जपून न्याय निर्णय घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाची शिदोरी वापरावी. नाशिक रिंग रोडच्या संरेखनाच्या पर्यायावर अंतिम निर्णय मंत्री स्तरावर घेतला जाणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ या चारही मंत्र्यांनी एकत्रितपणे शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही सर्व मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, आदींसह बाधित शेतकरी उपस्थित होते. नाशिक रिंग रोड नेमका कुणाच्या फायद्यासाठी होत आहे, असा प्रश्न करण्यात आला. रिंग रोडच्या भू संपादनात शेतकरी भूमिहीन होऊ नये, कोणाची घरे, विहिरी, गोठे व शेती उद्ध्वस्त होणार नाही, याची काळजी घेत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
छगन भुजबळ काय म्हणाले ?
या आंदोलनावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. विकास कामे करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे. नाशिकमधील रिंग रोड विस्ताराच्या संदर्भात प्रशासन शेतकऱ्यांशी योग्य ती चर्चा करत आहे. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, हीच शासनाची भूमिका राहील असे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *