गळ्यात मंडकं आणि मागे झाडू बांधून आंदोलन
मिरा -भाईंदर : महानगरपालिका प्रशासनाने मिरा-भाईंदर शहरातील चर्मकार समाजातील बेरोजगारांना चर्मकार व्यवसायासाठी गटई स्टॉल मंजूर केले होते. हे गटई स्टॉलधारक नियमानुसार शहरात आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र त्यांच्यावर कारवाई करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू झाले आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक संपन्न झाल्यानंतर बहुमताने भाजप नगरसेवक निवडून आले. या बहुमताच्या जोरावर विशेषता शहरातील ज्या विभागात गुजराती राजस्थानी नगरसेवक जास्त आहेत, अशा ठिकाणाच्या नगरसेवकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून चर्मकार समाजाला त्रास देणे सुरू केले आहे. या प्रकारानुसार या प्रभागातील काही गुजराती राजस्थानी भाजप नगरसेवकांतर्फे मनपा प्रशासनावर दबाव टाकून यांच्यामार्फत त्यांनी महापालिकेस सदर स्टॉल हटवीण्यासाठी नोटीस काढण्यास लावली आहे. यावर सदर स्टॉल धारकाने सभापती श्रीमती वर्षा भानुशाली यांना १९ फेब्रुवारी रोजी आमच्या स्टॉलवर कारवाई करू नका, अशा पद्धतीने दया याचना केली होती, मात्र या नगरसेविकेने तुमच्यावर कारवाई होणारच असे या स्टॉलधारकास सांगितले.
यामुळे महापालिका प्रशासनाने स्टॉल परवानगी रद्द केली. त्यामुळे या गरीब कुटुंबांने सदर स्टॉलला कर्ज काढून केलेला खर्च कुठून परतफेड करायचा ? तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा धारकाला दिलेली करायचा? या विवंचनेतून या कुटुंबाने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदर सागर कुंभारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री या युवक युवतींचा मोठा साडेतीन वर्षाचा मुलगा आदर्श, आणि पाळण्यातील चार महिन्याच्या नील या मुलास घेऊन हे कुटुंब उपोषण स्थळी बसलेले आहेत. मात्र १२ मे रोजी सुरू केलेल्या या उपोषणास एवढे दिवस झाले, तरीही महापालिका प्रशासन किंवा भाजप पक्षाचे कोणीही नेते या गरीब कुटुंबास भेटण्यास आले नाही.
२६ मे रोजी कुंभारे यांनी गळ्यात मंडकं बांधून तसेच मागे झाडू बांधून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक करून सोडून दिले. यावर वंचित आघाडीने त्यांना समर्थन दिले असून हे आंदोलन शहरभर पसरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष इकबाल महाडिक यांनी सांगितले.
