पालघर : भारत सरकारच्या डेडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या मालवाहतुकीसाठी विशेषत्वाने राखीव लोहमार्गाचा पहिला टप्पा २५ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला. जेएनपीए ते सफाळे असा टप्पा कार्यान्वित झालेला असून महत्त्वाच्या बंदरांवरती मालवाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प गेम चेंजर समजला जात आहे. जेएनपीएचे न्हावा शेवा येथील बंदर तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये निर्माण होणारे वाढवण बंदर यांच्या देशातील विविध ठिकाणी जोडणीसाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो.
रेल्वे मंत्रालयाने २५ मे रोजी प्रसिद्धी माध्यमांतून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर चा जेएनपीए ते सफाळे हा टप्पा कार्यान्वित होत असल्याचे जाहीर केले.या प्रकल्पांमुळे मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही मार्ग वेगळे झाल्यामुळे प्रवाशांच्या गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यास मदत देखील होणार आहे.या मार्गांवर गाड्या ताशी १०० किमी वेगाने धावू शकतात. तसेच, यावर डबल-डेकर कंटेनर आणि प्रचंड वजनाच्या (१३,००० टन) मालगाड्या चालवण्याची विशेष सोय आहे. तूर्तास सुरू झालेला टप्पा हा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर चा भाग आहे यात जेएनपीटी (नवी मुंबई) ते दादरी (उत्तर प्रदेश) पर्यंतचा हा सुमारे १५०६ किमी लांबीचा मार्ग आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) ही केवळ दोन प्रमुख बंदरे आहेत. मुंबई बंदराच्या सभोवतालच्या शहराच्या विकासामुळे तसेच बंदरातील मर्यादित खोलीमुळे, जिथे फक्त लहान जहाजेच नांगरता येतात, गेल्या अनेक दशकांपासून मालवाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईच्या उत्तरेकडील वाढवण येथील अरबी किनारा नवीन बंदराच्या विकासासाठी सर्वात योग्य आणि आदर्श आहे, जिथे सुमारे साडेचार सागरी मैलांच्या अंतरावर २० मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे. हे ठिकाण राष्ट्रीय रेल्वे जाळ्यापासून सुमारे १० किमी आणि राष्ट्रीय महामार्ग ८ पासून सुमारे ३५-४० किमी अंतरावर आहे.केंद्र सरकारने या बंदरासाठी तब्बल ७६ हजार २०० कोटी रुपयांची मंजुरी दिली. महाराष्ट्रासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प तर आहेच, पण पूर्णपणे तयार झाल्यानंतर वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक असणार आहे. हा प्रकल्प दोन फेजमध्ये पूर्ण केला जाणार असून पहिला फेज २०२९ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
वाढवण बंदराच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली असून हे बंदर पूर्ण होण्याच्या अगोदरच त्याची रेल्वे मार्गे आणि रस्ता मार्गे देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडणीचे काम देखील समांतर पातळीवर सुरू झालेले आहे. ज्या प्रकारे वाढवण बंदर रेल्वे मार्गाने जोडण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे त्याचप्रमाणे ते रस्ता मार्गे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.या महत्त्वाकांक्षी जोडणी प्रकल्पामुळे वाढवण बंदरावरून होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशाच्या इतर भागांत जलद आणि स्वस्त दरात पोहोचणे शक्य होणार आहे.हा जोडमार्ग डहाणू जवळील वाढवण (तवा) येथून सुरू होऊन नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भरवीर येथे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.या द्रुतगती महामार्गामुळे पालघर ते नाशिक दरम्यानचा ५ तासांचा प्रवास अवघ्या ९० मिनिटांत (दीड तासात) पूर्ण होईल.या प्रकल्पासाठी सुमारे १४,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वाढवण बंदराच्या अनन्य साधारण महत्त्वामुळे ते पूर्ण होण्याच्या अगोदरच बंदर जोडणीचे काम प्राधान्य क्रमाने सुरू झाले आहे. वाढवण बंदर निर्मितीमुळे पालघर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार तसेच व्यवसाय संधी उपलब्ध होतील. परंतु दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने देखील रोजगार सुलभता आणि व्यवसाय संधी निर्माण होणार आहेत.
