१९ वर्षाखालील एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक क्रिकेट स्पर्धा
मुंबई : दिलीप वेंगसरकर सरांच्या क्रिकेट मधील योगदानाला भारतात तोडच नाही असे मुंबई क्रिकेट अससोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटले आहे. माहुल, चेंबूर येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. वेंगसरकर हे एकमेव माजी भारतीय कर्णधार आहेत जे ‘ग्रास रूट लेव्हल’ वर आजही अविरत काम करीत असून भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान अतूनलनीय आहे असे ते पुढे म्हणाले. दरम्यान येथील स्थानिक आमदार तुकाराम काते हे देखील यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले चेंबूर मध्ये आर. के. स्टुडिओ, (जो आता विकला गेला आहे), आणि दिलीप वेंगसरकर यांची क्रिकेट अकादमी अशी जागतिक दर्जाची दोन स्मृती स्थळे आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. या स्पर्धेत सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी संघाने श्री माँ विद्यालय संघावर ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
निर्धारित ३५ षटकांच्या या सामन्यात श्री माँ विद्यालय संघाने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय चांगलाच फसला. प्रभंजन पाताडे (११ धावांत ४ बळी) आणि संचित कदम (२१ धावांत ४ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव ३२.४ षटकांतच केवळ ११५ धावांत गारद झाला. आग्नेय आदी याने १९ चेंडूत सहा चौकर आणि एक षटकार ठोकत सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली तर सागर गुप्ता (२०), ऋग्वेद जाधव ( नाबाद १०), आर्यन कुमार (१८) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. या तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी संघाने १८.१ षटकांतच ३ बाद ११६ धावा करून विजेतेपदाला गवसणी घातली. लक्ष्य झवर याने ३३ चेंडूंतच नाबाद ६१ धावांची तडाखेबाज खेळी करताना ५ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. त्याला आदित्य मुळे (१६) आणि अथर्व अधिकारी (१८) यांनी मोलाची साथ दिली.
अंतिम सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रभंजन पाताडे(७ बळी) याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज लक्ष्य झवर , सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ध्रुव ब्रीद , तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून यष्टीरक्षक सागर गुप्ता (श्री माँ विद्यालय) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एम.सी.ए. चे अध्यक्ष अजिंक्य नाईक, स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक – श्री माँ विद्यालय – ३२.४ षटकांत सर्वबाद ११५ (सागर गुप्ता २०, आग्नेय आदी ३८, ऋग्वेद जाधव नाबाद १०, आर्यन कुमार १८; प्रभंजन पाताडे ११ धावांत ४ बळी, संचित कदम २१ धावांत ४ बळी) पराभूत वि. सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी – १८.१ षटकांत ३ बाद ११६ (आदित्य मुळे १६, अथर्व अधिकारी १८, लक्ष्य झवर नाबाद ६१; युग एस. २५ धावांत २ बळी). सामनावीर – प्रभंजन पाताडे.
