नवी मुंबईत ६६३ पाणी नमुन्यांची तपासणी; पाणी गुणवत्ता मानकांनुसार योग्य
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात आली. महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार २८ मे २०२६ रोजी ही मोहीम आयोजित करण्यात आली.
अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), कार्यकारी अभियंता (मोरबे), संबंधित विभागीय उपअभियंते, सहाय्यक अभियंते, कनिष्ठ अभियंते तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेचे कंत्राटदार सहभागी झाले होते.
भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्र, बेलापूर ते दिघा विभाग तसेच मुख्य जलवाहिन्यांवरील विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सखोल तपासणी करण्यात आली. यामध्ये भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्र येथे ७२, मुख्य जलवाहिनीवर ९६ तर बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा विभागांत ४९५ अशा एकूण ६६३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान पाण्याचे pH, TDS, अवशिष्ट क्लोरीन (Residual Chlorine) आणि गढुळपणा (Turbidity) या घटकांची भारतीय मानक ब्युरो (BIS IS 10500) तसेच CPHEEO मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार योग्य असल्याचे आढळून आले.
नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून पाणी गुणवत्तेबाबत नियमित तपासणी सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सध्या स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा होत असल्याची नोंद घ्यावी, तसेच पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयात किंवा १८००२२२३०९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
