पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” तसेच नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १ जूनला सायंकाळी ५ वाजता पनवेल येथे “स्वर संध्या” या भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव करण्यासाठी अमृत महोत्सव वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या “स्वर संध्या” या कार्यक्रमात संगीतप्रेमींसाठी दर्जेदार आणि सुरेल संगीताची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड तसेच ज्ञानेश्वरी धाडगे आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दोन्ही कलाकारांनी आपल्या गायकीच्या जोरावर अल्पावधीतच रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून त्यांच्या सादरीकरणाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कार्यक्रमाला पंडित प्रताप बुवा पाटील यांची मृदुंग साथ, प्रसाद पाध्ये यांची तबला साथ तसेच सूर्यकांत सुर्वे यांचे तालवाद्य लाभणार आहे. अनुभवी कलाकारांच्या साथसंगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. याशिवाय नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा यांच्यावतीने सुरेल भजन सादर करण्यात येणार असून गायिका शिवमाला पाटील, पखवाज वादक निलेश पाटील तसेच तबला साथीसाठी मृगेंद्र कडू हे कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके करणार आहेत. संगीत, भजन आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेल्या या अविस्मरणीय मैफलीचा लाभ रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” तसेच “नादब्रह्म साधना मंडळ खारघर” यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000000000
