सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून MahaDBT 2.0 मध्ये परावर्तित (Migration) होत आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण विभाग, ठाणेचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहेत.
सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची वेळेत पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कोणताही विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे इंगळे यांनी नमूद केले.
तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांची तात्काळ तपासणी करून मंजुरी व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रकरणी दिरंगाई झाल्यास संबंधित प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिला आहे.
