६६ हजार २०० रुपये किमतीचा ३.३१२ किलो गांजा जप्त
सुनिल इंगळे
उल्हासनगर : अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची विठ्ठलवाडी पोलिसांनी धरपकड सुरू केले असून उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक खाली गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी झडप घालून अटक केली आहे. त्याच्याकडून ३.३१२ किलोग्राम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ६६ हजार २०० रुपये किमतीचा माल जप्त करण्याची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. ही मोहीम सुरू असताना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांना गुप्त बातमीदारांने उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील स्टेशन जवळ स्कायवॉक खाली गांजा या अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली दिली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ, पोलीस हवालदार दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, पोलीस नाईक भागवत दहिफळे, पोलीस शिपाईगणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड व सौरभ ठाकूर या पोलीस पथकांनी स्कायवॉक जवळ सापळा लावून रवींद्र नामदेव सैंदाने (३५) या इसमाला झडप घालून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३.३१२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ६६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी त्याच्या जवळून ताब्यात घेतला. त्याचा दुसरा सहकारी दगडू निकम हा त्या ठिकाणाहून पसार झाला. पोलिसांनी त्याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिलीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रवींद्र सैदाने व दगडू निकम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे करीत आहेत. अमली पदार्थ विरोधात पोलिसांची ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *