केडीएमसी सभागृह नेते वरुण पाटील यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यालगत असलेल्या ऐतिहासिक भाटाळे तलावावरील अतिक्रमणे हटवून तलावाचे संवर्धन करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली असून याबाबत केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे वरुण पाटील यांनी याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना देखील पत्र देऊन या तलावाच्या संवर्धनासाठी प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी केली आहे.
कल्याण शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन शहर असून, येथील दुर्गाडी किल्ला व परिसर हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्गाडी किल्ल्यालगत असलेला भाटाळे तलाव हा देखील शहराच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या तलावाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली, असून तलावाचे मूळ क्षेत्र कमी होत चालले आहे. तलावाच्या काठावर अनधिकृत बांधकामे, भराव टाकणे, कचरा टाकणे व इतर बेकायदेशीर उपक्रमांमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाचे नुकसान होत आहे.
त्यामुळे भाटाळे तलावाची अधिकृत हद्द व क्षेत्रफळ अभिलेखांनुसार निश्चित करण्यात यावे. तलाव परिसराचे संयुक्त मोजमाप करून सर्व अतिक्रमणांची यादी तयार करण्यात यावी. तलावावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. तलावाभोवती संरक्षक भिंत/कंपाऊंड उभारण्यात यावे. तलावाचे सुशोभीकरण, संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा. भविष्यात कोणतेही नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचा “वारसा स्थळ” म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा.
भाटाळे तलाव हा केवळ जलस्त्रोत नसून कल्याण शहराच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही महानगरपालिकेची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केली आहे.
