चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट चष्मे, व्हीलचेअर, शिलाई मशीन व लॅपटॉप वाटप
अशोक गायकवाड
मुंबई : विकसित भारत म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपन्न भारत घडवणे इतकेच अभिप्रेत नाही. तर विकसित भारत घडवण्यासाठी दिव्यांग लोकांना देखील विकास कार्यात समान भागीदार बनवावे लागेल. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, दृष्टिहीन व्यक्तींना एआय – स्मार्ट चष्मे, व्हिलचेयर व दिव्यांग स्नातक युवकांना लॅपटॉप वितरित करण्यात आले. शासन व सामाजिक संस्था एकत्र येऊन कार्य करतात तेंव्हा दिव्यांग सक्षमीकरणाचे कार्य यशस्वी होते असे सांगून राज्यपालांनी हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात १०० दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, ५० महिलांना शिलाई मशीन, १०० दृष्टिहीन व्यक्तींना एआय स्मार्ट चष्मे व ३ दिव्यांग युवकांना लॅपटॉप देण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. श्याम चांडक व न्या. मकरंद कर्णिक, न्या. ( सेवानिवृत्त) के के तातेड, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन, उद्योजक प्रवीण कोठारी, देवेंद्र जैन, नरेंद्र राठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.जी. तापडिया आदी उपस्थित होते.
