श्रमजीवी संघटनेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
मिरा -भाईंदर : मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ‘श्रमजीवी संघटने’च्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
मिरा -भाईंदर महापालिका क्षेत्रातील जीवित्त्व नगर, केसरी पाडा, शेंबाड पाडा, वाड्याचा पाडा, शक्ती नगर, चवलीपाडा, मरगळीपाडा आणि केळीचा पाडा या आदिवासी पाड्यांमधील नागरिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत. शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असतानाही, येथील नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना नाले आणि खड्ड्यांमधील दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव संघटनेने निवेदनात मांडले आहे.
केंद्र सरकारच्या ‘अमृत जल योजने’द्वारे प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मीरा-भाईंदरमधील २१ आदिवासी गावांमधील नागरिकांनी ७५३ अर्ज सादर केले आहेत. मात्र, प्रशासनाकडून या अर्जांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
१. २१ आदिवासी पाड्यांमधील ७५३ अर्जदारांना तातडीने वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात यावे.
२. ज्या आदिवासी पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे, तिथे तातडीने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
प्रशासनाने या मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास ‘श्रमजीवी संघटना’ तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
