अमेरिकेच्या युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘टेक्नोव्हा २.०’ यशस्वी
कल्याण : एसएसटी महाविद्यालय आणि अमेरिकेतील युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिषद ‘टेक्नोव्हा २.० – २०२६’ यशस्वीरीत्या पार पडली. “टेक्नॉलॉजी, सायन्स आणि मल्टीडिसिप्लिनरी इनोव्हेशनमधील उदयोन्मुख प्रवाह” या विषयावर आधारित परिषदेत भारतासह विविध देशांतील संशोधक, प्राध्यापक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऑनलाइन माध्यमातून झालेल्या या परिषदेत विज्ञान, तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय संशोधन क्षेत्रातील नव्या संकल्पना, संशोधन निष्कर्ष आणि नवोपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहभागी संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर करत विविध क्षेत्रांतील आधुनिक घडामोडी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला.
तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव, विज्ञानातील अत्याधुनिक संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावरील संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून ज्ञान व संशोधनाची देवाणघेवाण घडवून आणण्याचे महत्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या SSTRACC समिती, व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, तांत्रिक सहाय्यक तसेच युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
000000
Heading – आगरी समाजातील तरुणांची पोलीस भरतीत उत्तुंग भरारी
Slug – २०२५-२६ च्या पोलीस भरतीत आगरी समाजातील अनेक तरुणांची निवड
कल्याण : ‘आगरी साहित्य शाळा, महाराष्ट्र राज्य’ या समूहाने  जाहीर झालेल्या निकालाचे विश्लेषण करून एक यादी तयार केली त्यात आगरी समाजातील मुला-मुलींनी पोलीस भरतीत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५-२६ च्या पोलीस भरतीत अनेक उमेदवारांची पोलीस दलात निवड झाली आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण आगरी समाजात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी उमेदवारांमध्ये रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई परिसरातील विविध ग्रामीण भागांतील मुला-मुलींचा समावेश आहे. पेण, कर्जत, अलिबाग, मुरबाड, कल्याण, शहापूर, टिटवाळा, अंबरनाथ आणि उरण यांसारख्या दुर्गम व निमशहरी भागांतून आलेल्या या तरुणांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे यश खेचून आणले आहे. यशस्वी उमेदवारांनी पोलीस गणवेश परिधान करण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. यामध्ये मुलींनीही मोठ्या प्रमाणावर बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
या यशाबद्दल ‘आगरी साहित्य शाळा, महाराष्ट्र राज्य’ समूहाच्या वतीने सर्व यशस्वी उमेदवारांचे “समद्यांचा पक्का पक्का आबीनंदन!” अशा मराठमोळ्या आणि आगरी बोलीभाषेच्या शैलीत जाहीर कौतुक करण्यात आले आहे. “आगरी साहित्य शालेला तुमचा आबीमान हं!” अशा शब्दांत समूहाने या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पोलीस दलात निवड झालेल्या या सर्व नवतरुणांवर आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या ‘आगरी साहित्य शाळा’ समूहावर सध्या संपूर्ण स्तरातून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *