जोसेफ दिलराज आणि अक्षीत जोडीचे पुरुष दुहेरीत दिमाखदार विजेतेपद”
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध राज्यांमधील अनेक खेळाडू गेली काही वर्ष प्रगत बॅडमिंटनचे धडे गिरवीत आहेत यातीलच केरळ राज्यातील खेळाडूंनी ठाण्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे .
केरळ राज्यातील बॅडमिंटन विश्वात अत्यंत प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अखिल भारतीय आमंत्रितांच्या बॅडमिंटन टूर्नामेंट’ स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या जोसेफ दिलराज याने अक्षीतसोबत पुरुष दुहेरी गटात शानदार विजेतेपद पटकावत ठाण्याच्या क्रीडा विश्वाचा लौकिक पुन्हा एकदा उंचावला. २४ मे २०२६ रोजी केरळमधील त्रिशूर येथील भव्य हायलाईट मॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल आणि निमंत्रित अशा केवळ ८ पुरुष दुहेरी जोड्यांचा सहभाग होता.
संपूर्ण केरळ राज्यातील बॅडमिंटनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच अत्यंत वेगवान, आक्रमक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले. हायलाईट मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी प्रत्येक सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेचे वातावरण अधिक रंगतदार बनवले. देशातील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष ग्लॅमर आणि प्रतिष्ठा लाभली होती.
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणारा जोसेफ दिलराज हा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून, मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुळे, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराज्य स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात जोसेफ आणि अक्षीत या जोडीने उत्कृष्ट समन्वय, आक्रमक स्मॅशेस आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी जोड्यांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यातही त्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि वेगवान खेळ करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या खेळातील सातत्य, कोर्ट कव्हरेज आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता विशेष उठून दिसली.
आपल्या बॅडमिंटन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या ध्येयाने जोसेफ दिलराज याने स्वतःचे संपूर्ण आयुष्य ठाण्यात स्थायिक करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमधील आधुनिक प्रशिक्षण सुविधा, स्पर्धात्मक वातावरण आणि प्रशिक्षकांचे बारकाईने केलेले मार्गदर्शन यामुळे अनेक खेळाडूंप्रमाणेच जोसेफचाही खेळ अधिक परिपक्व आणि आक्रमक होताना दिसत आहे. राज्यापासून राष्ट्रीय आणि आता आंतरराज्य स्पर्धांमध्येही अकॅडमीचे खेळाडू सातत्याने यश मिळवत ठाणे शहराच्या क्रीडा परंपरेला नवी उंची देत आहेत.
जोसेफ दिलराजच्या या उल्लेखनीय विजेतेपदाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी विशेष आनंद व्यक्त करत, “मोठ्या स्पर्धांमध्ये दबावाखाली खेळण्याची जोसेफची क्षमता आणि त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा त्याला आगामी काळात आणखी मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी जोसेफ, त्याच्या सहकाऱ्यांचे आणि संपूर्ण प्रशिक्षक वर्गाचे अभिनंदन करत, ठाणे बॅडमिंटन अकॅडमी राज्याबरोबरच देशातील बॅडमिंटन क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले.
