भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांचे आयोजन
कल्याण : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२६ रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे सदस्य मेहुल पुण्यार्थी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात पार पडला. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा हा सुवर्णक्षण स्मरणात राहावा यासाठी दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदाचा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शाहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
स्वराज्याच्या इतिहासात कल्याण नगरीला विशेष स्थान आहे. हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या भूमीतून मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रायगडावर पोहोचून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या समन्वयासाठी विशेष व्हॉट्सॲप कम्युनिटी तयार करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली व ठाणे जिल्ह्यातील इच्छुक शिवभक्तांनी ९७६८८८८५२५ या क्रमांकावर संपर्क साधून कम्युनिटीमध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *