दोषींवर कडक कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी
कल्याण : माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून भीमशक्ती प्रदेश सरचिटणीस तथा महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍड. अपेक्षा दळवी व त्याचप्रमाणे भीमशक्ती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष ऍड. अजिंक्य साळवे यांच्या माध्यमातून बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी घडलेल्या घटनेचा तीव्र कठोर शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड.अपेक्षा दळवी यांनी दिला आहे.
यावेळी भीमशक्ती संघटना जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. गुलाब खंदारे, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अरुण पाठारे, भीमशक्ती संघटनेचे ऍड. संजय जाधव, ऍड. पंकज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शशांक जाधव, भीमशक्तीचे संकेत धनराव, अण्णा पंडित, मंगेश इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण परिसरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आणि धार्मिक, सांस्कृतिक केंद्र असलेली ‘बुद्धभूमी’ याठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्थानिक बौद्ध समाज आणि सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना तीव्र ठेच पोहोचली आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करून दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी.
जागेचा पुनर्विकास शासकीय खर्चाने पुन्हा पूर्ववत करुन देण्यात यावे. भविष्यात अशा धार्मिक स्थळांची सुरक्षा राखण्यासाठी या परिसराला कायमस्वरुपी सुरक्षा पुरविण्यात यावी. जर ही कारवाई प्रशासकीय निष्काळजीपणामुळे किंवा दबावाखाली झाली असेल, तर संबंधित जबाबदार अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागण्यांची दखल घेऊन पुढील ७ दिवसांत योग्य ती कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण कल्याण शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड. अपेक्षा दळवी यांनी दिला आहे.
0000000000
