– शिवचरित्रातून युवकांना शिकण्यासारखे भरपूर
मुंबई  : आजकाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राच्या नावावर चुकीचा इतिहास शिकविण्यात येतो. ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या दंतकथा पुढे आणण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. युवकांना शिवचरित्रातून खऱ्याखुऱ्या असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. यासाठी युवकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, शिवभक्त राजू देसाई यांनी आजच्या तरुण पीढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवभक्त राजू देसाई यांचे ‘अपरिचित साम्राज्याचा इतिहास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राजू देसाई यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून सगळ्याच वयोगटासाठी बरेच काही शिकण्यासारखे आहे. आयुष्यात एखादी कृती करताना किंवा समाजात वागताना आधी हा विचार करायला हवा की आपली कृती किंवा वागणे  महाराजांना पटेल का ? आज महाराजांच्या राज्यात वृद्धाश्रम वाढत आहेत. पण कोणतीही सामाजिक संस्था वृद्धाश्रम वाढू नयेत म्हणून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवीत नाही. तरुणांमध्ये शिवचरित्रामधून काय शिकायला हवे ह्याचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यवाह स्मीता चितळे यांनी शिवभक्त राजू देसाई यांचे स्वागत केले.  उपाध्यक्ष संजय देशपांडे यांनी पसायदान म्हटले. शिवभक्त राजू देसाई यांच्या व्याख्यानासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.  याच कार्यक्रमात प्रख्यात पार्श्वगायिका दिवंगत सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *