– आनंद बाल शिबिरात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा चिमुकल्यांना संदेश
पुणे.दि.३: शिवसेना भवन येथे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद बाल शिबिर’ उपक्रमात मंगळवारी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभागी होत बालचमूंशी संवाद साधला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य सादर करून व ओरिगामी कलेतून साकारलेल्या विविध कागदी वस्तू भेट देत डॉ. गोऱ्हे यांचे स्वागत केले.
संवादादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी मुलांना भविष्यात काय बनायचे आहे, अशी विचारणा केली असता एअर होस्टेस, डॉक्टर, कलेक्टर, वकील, पोलीस अधिकारी, सैनिक आणि व्यावसायिक होण्याची स्वप्ने मुलांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याबरोबरच पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकण्याचा सल्ला दिला. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर राग मनात न ठेवता सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती जोपासावी, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना भवनात मुक्तपणे वावरणाऱ्या, खेळणाऱ्या आणि आनंदाने बागडणाऱ्या मुलांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला होता. लहान मुलांचे खेळ आणि शिबिरे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा आवडीचा विषय असल्याची आठवण करून देताना डॉ. गोऱ्हे यांनी ठाण्यातील आनंदाश्रमाप्रमाणेच पुण्यातील शिवसेना भवनातही लवकरच मोफत स्पोर्ट्स लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालकही उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पालकांना मुलांसमोर मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले. मुलांसोबत प्रत्यक्ष संवाद वाढविणे आणि त्यांच्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुधीर कुरुमकर, वैभव वाघ, संदीप शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांचा भोर-मुळशी विधानसभेच्या वतीने सत्कार
दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांची सलग पाचव्यांदा विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना भोर-मुळशी विधानसभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कांता पांढरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी भोर-मुळशी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
