मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दहिसर येथील शुक्ला कंपाऊंड येथील रहिवाशांना न्याय मिळवून दिला आणि त्यांना बेघर होण्यापासून वाचवले. याबद्दल माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा दहिसर च्या आमदार मनीषा चौधरी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. विकासकाला हाताशी धरून दहिसर येथील शुक्ला कंपाऊंड मधील गाळेधारक व झोपडीधारकांना निष्कासित करून त्यांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या पाठीशी माजी खासदार गोपाळ शेट्टी हे या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रसंगी आंदोलने केली, विविध संबंधित आस्थापनांमध्ये बैठका घेतल्या, त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाई देत न्याय मागितला. जनसामान्यांसाठी लढणाऱ्या या लोकप्रतिनिधी गोपाळ शेट्टी यांना अखेर यश आले. शुक्ला कंपाउंड येथे राहणाऱ्या नागरिकांना व तेथील गाळेधारकांना हक्काचे घर व गाळेधारकांना गाळा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शुक्ला कंपाऊंड येथील नागरिकांना आता झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विकासकाच्या मार्फतच घर मिळणार असून
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी जो पाठपुरावा करून संघर्ष केला, हजारो कुटुंबांना न्याय मिळवून त्यांना बेघर होण्यापासून वाचवले, या ऐतिहासिक कामगिरी केल्या प्रित्यर्थ गोपाळ शेट्टी यांचा स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडांगण, दहिसर (प.), मुंबई येथे आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दहिसर येथील मुंबई महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांचा देखील उचित सन्मान व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत पांडे, स्थानिक नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
