– १५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नवी मुंबई : (अशोक गायकवाड )—टपाल सेवांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे आणि विविध समस्यांचे वेळेत निवारण करण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या नवी मुंबई विभागाद्वारे आगामी ३० जून रोजी पहिल्या ‘डाक अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक बी. व्ही. एन. सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही अदालत पार पडणार असल्याची माहिती नवी मुंबई मंडळ टपाल विभागाचे वरिष्ठ अधिक्षक यांनी दिली आहे. या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने नवी मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या टपाल सेवांशी संबंधित अशाच तक्रारींची दखल घेतली जाईल, ज्या मूळ तक्रार दाखल केल्यापासून ६ आठवड्यांच्या कालावधीत सोडवल्या गेलेल्या नाहीत. यामध्ये विनानोंदणीकृत व नोंदणीकृत पत्रे, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, टपाल बचत बँक आणि मनी ऑर्डरचे पैसे न मिळणे यांसारख्या विविध सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारी व गाऱ्हाणी स्वीकारली जातील आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष सुनावणी घेऊन तात्काळ निवारण केले जाईल. ही डाक अदालत मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वरिष्ठ टपाल अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य डाकघर इमारत, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर १६ए, प्लॉट नं. १८, एमटीएनएल कार्यालयासमोर, वाशी, नवी मुंबई – ४००७०३ या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. डाक अदालतीमध्ये आपली तक्रार सादर करताना नागरिकांनी आपल्या अर्जात मूळ तक्रार दाखल केलेली तारीख, तक्रारदाराचे नाव आणि ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार आधी पाठवली होती त्यांचे पदनाम यांसह आवश्यक तो संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आहे. इच्छुक ग्राहकांनी आणि नागरिकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज दोन प्रतींमध्ये वरिष्ठ टपाल अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी – ४००७०३ यांच्या पत्त्यावर दिनांक १५ जून २०२६ किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन नवी मुंबई परिसरातील टपाल ग्राहकांनी आपल्या प्रलंबित समस्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन नवी मुंबई मंडळ वाशी टपाल विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
