नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते गौरव
दिवा: ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थी सचिन पंडित याने एसएससी परीक्षेत ९५.८० टक्के गुण मिळवत दिवा शहरात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यास शाळेचे विश्वस्त महेंद्र दळवी, प्राचार्या ज्योत्स्ना सोनी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिनच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले.
मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या सचिनने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळविले. शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्याने आपल्या कुटुंबासह दिवा शहर आणि ग्लोबल इंग्लिश स्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि शाळा व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शाळा व्यवस्थापनाने सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले. सचिन पंडित याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, कठोर मेहनत, सातत्य आणि समर्पणाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
०००००००००
